थोरात यांच्या परतीच्या आवाहनाला सत्यजीत तांबेनी कवितेतून दिला नकार

काँग्रेसमधील राजकारण आणखी तापले असून मामा बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये परत येण्याच्या आवाहनाला आमदार सत्यजित तांबे यांनी कवितेतून नकार दिला आहे.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी।
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी।

या कवितेच्या ओळी तांबे यांनी ट्विट केल्या आहेत. संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये परत या तोच आपला विचार आहे असे आवाहन केले होते. मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत काँग्रेस पक्षाने जो घोळ घातला त्यावरून तांबे यांची नाराजी अद्याप गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नजरेत सदा नवी दिशा असावी याचा अर्थ सत्यजित यांनी वेगळा विचार केला आहे का असा लावला जात आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे इच्छुक असताना काँग्रेस पक्षाकडून त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सत्यजित यांना उमेदवारी दिली जाणार असे सांगितले. मात्र एबी फॉर्म चुकीचा दिला. काँग्रेस पक्षामध्ये थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संघर्षातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून आपली नाराजी श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र तरीही श्रेष्ठींनी पटोले यांना अभय दिल्याने सत्यजित तांबे यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.