आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाची अखेर परवानगी

आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. या आधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास नाकारण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते मग शिवजयंतीबाबत भेदभाव का असा सवाल उपस्थित करत संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता पुरातत्व खात्याने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

अजिंक्य देवगिरी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पुरातत्व खात्याने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी मिळेल असे म्हटले होते.