भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. पुजारा सध्या खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियासोबत आहे. दरम्यान या मालिकेत पुजारा नागपुरात त्याच्या कारकिर्दीतील 99 वी कसोटी खेळला. ज्यामुळे आता तो 100 वी कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याद्वारे पुजारा आपली 100 वी कसोटी खेळणार आहे.
जागतिक क्रिकेटमधील फार कमी खेळाडूंनी १०० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. पुजारा आता लवकरच त्या यादीत सामील होणार आहे. त्यातही विशेष म्हणजे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पुजाराचे पंतप्रधान मोदींकडून आधीच अभिनंदन करण्यात आले आहे. १०० व्या कसोटीपूर्वी पुजारा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेला तेव्हा त्याला मोदींकडून विशेष शुभेच्छा मिळाल्या. त्यांनी १०० व्या कसोटीपूर्वी पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले- ‘हे क्षण माझा उत्साह वाढवणारे आहेत. पंतप्रधान मोदींना भेटणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. या भेटीसाठी पंतप्रधान मोदी यांचे मन:पूर्वक आभार.’
ऑक्टोबर 2010 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणार्या चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत करिअरमध्ये एकूण 99 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 169 डावात फलंदाजी करताना त्याने 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 19 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 धावा आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 51 धावा केल्या आहेत.
