मनसेचा चिंचवड, कसब्यात भाजपला पाठिंबा

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. मात्र, भाजप उमेदवार हेमंत रासने आणि अश्‍विनी जगताप यांच्या प्रचारात मनसेचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत. असे मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात 2012 च्या निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक नगरसेवक या भागातूनच निवडून आले होते. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्याचा भाजपला फायदा होणार आहे.

मनसेनं या निवडणुकीसाठी तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र कालच मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले की, भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. जगताप यांच्या या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.