एअर इंडिया आणि फ्रान्सच्या एअरबसमध्ये २५० प्रवासी विमानांचा करार झाला. अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने खरेदी करणार आहे. देशातील कंपन्यांना मिळालेल्या माेठ्या ऑर्डरचा आनंद व्यक्त करण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राॅन व अमेरिकेचे अध्यक्ष ज्याे बायडेन आवर्जून या समारंभाला ऑनलाईन उपस्थित राहिले. त्यांच्यावर या कंपन्यांचे दलाल असल्याचा आराेप झाला नाही. कारण तेथे दळभद्री लाेक नाहीत असे म्हणण्यात येत आहे.
भारताच्या राजकारणात विराेधी पक्षांकडून छुपी भांडवलशाही, उद्याेगपतींचा फायदा हे शब्द परवलीचे बनले आहेत. गाैतम अदानी यांच्यासारख्या उद्याेगपतीसाेबतचे फाेटाे दाखविले जातात. विविध आराेप केले जातात. अगदी दलाल असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर बायडेन आणि मॅक्राॅन यांनी आदर्श घालून दिला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या देशात उद्याेगाभिमुख वातावरण आणि उद्याेग संस्कृती आहेच पण राजकारणासाठी प्रत्येक गाेष्टीला विराेध करण्याची मानसिकतादेखील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत एअर इंडिया आणि एअरबस २५० प्रवासी विमानांचा करार झाला आहे. हा ऐतिहासिक करार फ्रान्सच्या भारताबरोबरील धोरणात्मक आणि मैत्रिपूर्ण सहकार्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल असल्याचे मॅक्राॅन यांनी म्हटले.
फ्रान्सची ही कंपनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आपले योगदान देण्यास उत्सुक असून उपलब्ध असलेले आधुनिक तंत्रज्ञान फ्रान्स भारताला पुरवित असल्याचेही त्यांनी सांगितले. एअर इंडिया व एअरबसमधील या सहकार्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी स्वागत केले आहे. यामुळे रोल्स रॉईस कंपनीसमोर मोठी संधी चालून आली असून यामुळे ब्रिटनच्या वेल्समधील कुशल मनुष्यबळाला रोजगार मिळणार असल्याचा दावा पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केला. एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने खरेदी करणार असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले. अमेरिकेत तयार झालेली दोनशेहून अधिक विमानांची एअर इंडियाला विक्री करण्यात येत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
