केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर ; स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी अमित शाह नागपुरात पोहोचणार असून तीन दिवसांचा महाराष्ट्र आणि वीस तासांच्या नागपूर दौऱ्यात अमित शाह अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री शुक्रवारी रात्रीच्या विमानाने नागपूरला येतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी रात्री १० वाजता नागपुरला येत आहे. रात्री त्यांचा वर्धा रोडवर स्थित रॅडीसन ब्ल्यू येथे मुक्काम आहे. १८ रोजी सकाळी १०.३० वाजता दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली वाहणार आहे. त्या नंतर ११ वाजता रेशिमबाग येथे जाऊन डाॅ. हेडगेवार स्मृतिस्थळ व गुरूजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील. नंतर एका स्थानिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

अमित शाह यांच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरातील भेटीच्या वेळेला सरसंघचालक मोहन भागवत किंवा संघाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नसले तरी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन्ही प्रमुख चेहरे त्यांच्यासोबत असणार आहेत. त्याशिवाय संघाचे विदर्भ प्रांत संघचालक आणि विदर्भ प्रांत सहसंघचालक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अमित शहा लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि दुपारी पुण्याला रवाना होतील.