उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली ; धनुष्यबाणासह शिवसेनाही एकनाथ शिंदेंचीच

निवडणूक आयाेगाने शिवसेना उध्दव ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

पक्ष चिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे.एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.