शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह निसटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का बसणार आहे. ठाकरे गटातला आणखी एक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येतेय. विशेष म्हणजे या खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याच्या माहितीनं खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगासमोर सादर झालेल्या कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा समोर आलाय. या खासदाराने प्रतिज्ञापत्र देऊन आपण शिंदे गटात असल्याचं सांगितल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. शिंदे गटात सहभागी झालेले गजानन किर्तीकर हे तेरावे खासदार आहेत. ठाकरे गटाकडे त्यानंतर फक्त पाचच खासदार उरलेत.तेव्हा शिंदे गटात येणारा ठाकरे गटाचा तो खासदार कोण याच्या चर्चा आता सुरु झाल्यात.
ठाकरे गटात उरलेल्या खासदारांची संख्या ५ इतकी होती. पण मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून फक्त चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा तो पाचवा खासदार कोण याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं नाही. शिंदे गटात सहभागी झालेले ४० आमदार आणि १३ खासदारांनी निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे शिंदे यांची बाजू बळकट असल्याचे आयोगाने आज आपल्या निकालात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पहिल्यांदाच इतकी मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांच्या सोबत भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. पुढे त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. ज्यामुळे शिंदे गट आणखी मजबूत झाला आणि पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांनी कामांचा धडाका लावला. मुंबई महापालिकेची निवडणूक देखील कधीची लागू शकते.
