निवडणूक आयाेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे स्पष्ट करून पक्ष आणि निवडणूक चिन्ह ही त्यांनी बहाल केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गरम झाले आहे. मात्र यामध्ये अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे चर्चेत आले आहेत.याचे कारण म्हणजे निवडणूक आयाेगाने शिवसेनेतील संघर्षावर निर्णय देताना थेट निवडून आलेले आमदार, त्यांना मिळालेली मते विचारात घेतली आहेत. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे राजू पाटील चर्चेत आले आहेत. या निकालानुसर राजू पाटील यांना हवे असेल तर मनसे पक्ष आणि चिन्ह इंजिन मिळू शकेल असे साेशल मीडियावर म्हटले जात आहे.
यावर राजू पाटील यांनी म्हटले आहे की बंड दिसताच क्षणी ‘त्यांची’ पक्षातून हकालपट्टी केली असती तर कदाचित ‘ते’अपात्र ठरले नसते परंतु पक्ष व चिन्ह शाबुत राहीले असते. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत सत्तेला आसुसलेले स्वार्थी व कमकुवत नेतृत्व आम्हाला लाभेले नाही हे आमचे भाग्यच! राजकारण माझा धंदा नाही त्यामुळे आमची चिंता नसावी.
