राज ठाकरेंनी सांगितलं आपलं खरं नाव; ‘राज’ नाव कसं पडलं? कुणी दिलं हे नाव?

राज ठाकरे हे नाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार, फर्डे वक्ते, महत्त्वाचे नेते म्हणून राज ठाकरे लोकप्रिय आहेत. राज ठाकरे या पाच अक्षरी नावाचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक दरारा आहे. पण राज ठाकरे यांचं खरं नाव वेगळच होतं हे तुम्हाला माहीत आहे काय? राज ठाकरे यांचं खरं नाव वेगळं होतं हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. राज यांचं खरं नाव स्वरराज होतं. स्वरराज ठाकरे ते राज ठाकरे हा प्रवास कसा झाला? याचाही एक किस्सा आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा किस्सा आज सांगितला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हीजेटीआय कॉलेजच्या रंगवर्धन या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमातील मुलाखतीत राज ठाकरे यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाचा किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. ‘माझं नाव स्वरराज आहे, यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. माझे वडील संगीतकार होते,माझ्या वडिलांची इच्छा होती की मी संगीत क्षेत्रात काही तरी करावं त्यामुळे त्यांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. पण नंतर बाळासाहेबांनी माझं नाव राज ठाकरे असं केलं’ असा किस्सा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितला.

माझे वडील संगीतकार होते, मोहम्मद रफी यांनी माझ्या वडिलांकडे 14 गाणी गायली. माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी संगीत क्षेत्रात काही तरी करावं, त्यामुळे त्यांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. माझ्या आईचं नाव लग्नामध्ये मधुवंती ठेवलं. मधुवंती हा राग आहे, माझ्या बहिणीचं नाव जयजयवंती ठेवलं. पण कालांतराने त्यांना माझा राग कळला. याला राग कुठे येतो, कुठे येत नाही हे त्यांना कळलं. मी जेव्हा व्यंगचित्र काढत होतो, त्यावेळी स्वरराज या नावाने काढत होतो. आणि एकेदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावलं, मी राजकारणाची सुरुवात बाळ ठाकरे नावाने केली, आजपासून तू राज ठाकरे या नावाने केली, तेव्हापासून मी राज ठाकरे झालो’ असं राज ठाकरेंनी सांगितलं.