राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर सरकार होत असताना मी राष्ट्रपती राजवट का उठवू नये? असा सवाल करत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काेश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. काेश्यारी म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना घेऊन माझ्याकडे आले. त्यांच्याकडे आमदारांच्या सह्यांचं पत्र होतं, राजकारणात एका क्षणात गोष्टी बदलतात मग एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली तर त्याचं नवल कशासाठी? राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे आल्यानंतर ‘बहुमत असेल तर सिद्ध करा’, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याच्या राजकारणात अजूनही अनेक गाेष्टी गुलदस्त्यात आहेत. या शपथविधीची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाेती असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला हाेता. याबाबत शरद पवार किंवा अजित पवार यांनी काेणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. अजित पवार यांनी तर मी याबाबत कधीच बाेलणार नाही असे म्हटले आहे. मात्र आता स्वत: अजित पवारच पत्र घेऊन आपल्याकडे आले हाेते असा खुलासा माजी राज्यपालांनी केला आहे.
