युतीत 25 वर्षे सडली म्हणणारे अडीच वर्षांत संपले; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांना टाेला

उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री हाेण्याची सुप्त इच्छा हाेती. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काॅंग्रेसशी छुपी युती केली हाेती, असा आराेप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उध्दव ठाकरे युतीत 25 वर्षे सडली असे म्हणत हाेते. पण ते युती तुटल्यावर अडीच वर्षांत संपले असा टाेलाही फडणवीस यांनी लगावला. झी चोवीस तास या वृत्तवाहिनीवर ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत उध्दव ठाकरे बाेलत हाेते. ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय याकरता होता की त्यांच्या मनातली सूप्त इच्छा होती ती मुख्यमंत्री होण्याची. त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा कधीच शब्द दिला नव्हता. निवडणुकीच्या आधी त्यांनी छुपी युती उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत केली. नंबर्स जसे आले तेव्हा त्यांना कळलं की तीन पक्ष एकत्र आले की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो. निकालाच्या दिवशीच ते आमच्यापासून वेगळे झाले. त्यांनी तसे संकेत दिले.

फडणवीस म्हणाले आम्हाला उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे समजल्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. कारण राजकारणात जेव्हा तुमच्यासोबत दगा होतो, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत रहावं लागतं. त्यानंतर गोष्टी कशा घडल्या ते तुम्ही महाराष्ट्राने पाहिलंच आहे. काही वाक्यं मी बोललो त्याचा वाक्य माध्यमांना लावता आला नाही. काही वाक्यं शरद पवार बोलले त्याचाही अर्थ माध्यमांना लावता आला नाही. अजित पवार जे आले तेव्हा प्रामाणिकपणे आले होते. त्यांनी आम्हाला फसवलं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने स्ट्रॅटेजी बदलली. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार येऊन टिकलं नाही. उद्धव ठाकरेंनी मोठी फसवणूक केली असंच मी म्हणेन कारण त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढल्या होत्या याचा त्रास जास्त होतो. कारण सोबत राहून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला.

उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात होते तेव्हा त्यांना अडवणारे एकनाथ शिंदे होते. मला तेव्हा एकनाथ शिंदेंनी अस्वस्थ होऊन फोन केला होता की तुम्ही एकदा मातोश्रीवर येऊन जा. सगळा विषय संपेल. एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून अस्वस्थ झाले होते. तीन पक्षाचं सरकार चालवणं कठीण होतं. राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं असे संकेत होते का ? यावर फडणवीस म्हणाले की असं काही होतं असं मला मुळीच वाटत नाही. जे मी सांगितलं आहे ते सत्यातलं अर्ध सांगितलं. राष्ट्रपती राजवट त्यावेळी लावण्याचा सल्ला कुणी दिला होता. राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी मी हे केलं असे जे पवारसाहेब सांगतात राष्ट्रपती राजवट का लागली? हे पण त्यांनी सांगावं.