नांदेड, परभणी, जालन्याचा महामार्ग पुर्ण झाल्यावर नांदेड – पुणे अंतर अवघ्या साडेतीन तासात पुर्ण होईल अशी माहिती रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी आज नांदेड च्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर विविध विकासकामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होते. गडकरी म्हणाले, नागपुर – रत्नागिरी महामार्गामुळे 11जिल्हे जोडले जाणार आहेत. नांदेड – रत्नागिरी महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नांदेडसह 11 जिल्हे या महामार्गाला जोडणार आहेत. या प्रकल्पासाठी 30 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला हा रस्ता जोडणारा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सन 2014 पर्यंत जिल्ह्यात 258 कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. सन 2014 नंतर आजपर्यंत जिल्ह्यात 766 कि.मी. रस्त्याची सुविधा निर्माण केली आहे. सुमारे 508 कि.मी.ची यात भर पडली आहे. येत्या 6 महिन्यात जिल्ह्यात ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती पुर्णत्वास येतील असे सांगून त्यांनी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या 7 कामांची घोषणा करून नांदेड जिल्ह्याला नवी भेट दिली.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी उड्डाणपुलांची मागणी केली. याचबरोबर तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेल्या देगलूर, मुखेड, उदगीर आणि किनवट भागातील रस्त्यांच्या कामांची मागणी केली. खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार यांनी विविध मार्गांच्या केलेल्या मागणीचा आंर्तभाव येत्या विकास कामात घेतल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगीतले.
तिर्थक्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष असून, माहुरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या आणि स्कायवाॅक करण्याचा प्रकल्प मंजुर केला आहे त्यासाठी सात कोटी रुपये मंजुर करुन घेतले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
