आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन; तीन दिवसीय अधिवेशन

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसचं महाअधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राजकारण, अर्थव्यवस्थेसह विविध विषयाचे ठराव मंजूर करण्यात येणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्यावरही या अधिवेशनात भर देण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचं हे 85 वे महाअधिवेशन 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशी गांधी कुटुंबातील एकही सदस्य या अधिवेशनात दिसणार नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पहिल्याच दिवशी दांडी मारणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. 25 आणि 26 फेब्रुवारीला विविध विषयांचे ठराव करण्यात येणार आहेत. उद्या (25 फेब्रुवारी) आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंध विषयांचे प्रस्ताव अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तर 26 फेब्रुवारीला कृषी आणि किसान कल्याण, युवा रोजगार, शिक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवरील प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.

या बैठकीत मसुदा समितीने तयार केलेल्या प्रस्तावावर एक एक करून विचार केला जाईल. त्यावर अनुमोदन केलं जाईल. तसेच विषय संबंधि समितीही त्यावर बैठक करेल. या बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल, असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. संचालन समिती आजच्या अधिवेशनात सविस्तर अजेंडा मांडेल. तसेच त्याचा स्विकारही करेल. भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हाथ से हाथ जोडो ही टॅग लाईन या अधिवेशनात ठेवण्यात आली आहे.