केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी होणार

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 284 व्या जयंतीला गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, महाराष्ट्राचे मंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहेत. गेल्या 3 वर्षांपासून संत सेवालाल महाराज धर्मादाय संस्था, नवी दिल्ली यांचे अध्यक्ष आणि कर्नाटकातील कलबुर्गी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंजारा समाजाचे एकमेव खासदार डॉ. उमेश जाधव हे दिल्लीत हा जन्मोत्सव साजरा करत आहेत. बंजारा समाजातील हजारो भगिनी आणि बांधव देशातील विविध राज्यांतून येऊन या समारंभात सहभागी होत असतात.हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ रोड, दिल्ली येथे होणार असून उदघाटन समारंभासह बंजारा कला आणि नृत्यांचे सांस्कृतिक, कार्यक्रम यावेळी दिवसभर सादर केले जाणार आहेत.

संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोंडनकोप्पा येथे झाला. ते बंजारा समाजातील आद्य समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु मानले जातात. देशभरात बंजारा समाजाची लोकसंख्या सुमारे 10 ते 12 कोटी असल्याचे मानले जाते. विशेषत: वनवासी आणि भटक्या जमातींची सेवा करण्यासाठी त लादेनिया समूहासह सेवालाल महाराजांनी देशभर प्रवास केला. आयुर्वेद आणि निसर्गोपचार मधील त्यांचे विलक्षण ज्ञान, उत्कृष्ट कौशल्ये आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे त्यांनी आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि अंधश्रद्धा दूर करून त्यांचे निर्मूलन करण्यात ते यशस्वी झाले आणि समाजाच्या जीवनपद्धतीत त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. देशभरात वेगवेगळ्या नावांनी स्थायिक झालेला बंजारा समाज आपली भटकी जीवनशैली आणि तांडा नामक वस्ती कायमची सोडून एकाजागी स्थायिक झाला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये संत सेवालाल महाराज हे प्रत्येक बंजारा कुटुंबात पूजनीय प्रतीक आहेत आणि या सर्व राज्यांमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संत सेवालालजी यांचे समाधी स्थळ महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात पोहरादेवी येथे आहे, ज्याला बंजारा काशी असेही म्हणतात.