मुंबई : नव्या पिढीचे आराेग्य आणि संस्कारासाठी काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रथम आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये हाेणार आहे. गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये हाेणार आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये करण्यात येत आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये हाेणार आहे. राज्यात अंगणवाडी सेविकांच्या हजाराे जागा रिक्त आहेत, अशी तक्रार नेहमी करण्यात येत असते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याची घाेषणश केली आहे. अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
