महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देताना उद्योग, पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की उत्तम अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल.समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चोफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.