नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांची मुले मुलीही ईडीच्या रडारवर आले आहेत. हेमा, रागिणी आणि चंदा या तीन मुली तसेच पुत्र तेजस्वी यादव यांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.
ईडीच्या पथकाने तीन मुली तसेच पुत्र तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तपासणी केली. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी छापेमारी केली आहे.दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती.
ईडीने शुक्रवारी मुंबई , दिल्ली आणि पाटणा येथे अनेक ठिकाणी या प्रकरणी कारवाई केली आहे. यादव यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील 15 ठिकाणी ईडीच्या पथकानं छापे टाकल्याची माहिती आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले राजदचे माजी आमदार के अबू दोजाना (यांच्या पाटणा येथील घरीही छापे टाकण्यात आले.
