शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे – रामदास आठवले

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनुभवी नेते असून, त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करावं असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. शरद पवार यांनी नागालँडमध्ये जो पाठिंबा दिला. तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आठवले हे धाराशिवच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आज बीडमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाचा उद्घाटन केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या बीड शहरातील नूतन कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आढावा देखील आठवले यांनी घेतला. यानंतर माध्‍यमांशी त्‍यांनी संवाद साधला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते बीडमध्ये थांबले असता यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले. पन्नास फुटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या नागालँड येथील निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या असून, जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करुन दाखवणार आहे.” मात्र या निवडणुकीत आपण भाजप आणि शिंदे यांच्यासोबत राहून आपल्या पक्षाचे खातं उघडणार असल्याचं आठवले म्हणाले.