अजित पवारांनी मानले चंद्रकांत पाटील यांचे आभार!

मुंबई : राज्यात काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर हा वाद गाजला होता. यावरून अजित पवार आक्रमक झाले होते. मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारच्यावतीने ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील बलिदान व समाधीस्थळाच्या कामाविषयी निवेदन करताना छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वराज्यरक्षक’ असा केला त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे आभार मानले.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने गेल्या अर्थसंकल्पात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान व समाधीस्थळाच्या विकासासाठी २५६ कोटी निधी मंजूर केला होता. या बलिदान व समाधीस्थळाचा आराखडासुध्दा मंजूर करण्यात आला होता. या कामाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती, त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मंजूर केलेला आराखडा विद्यमान सरकारने काही अल्प बदल वगळता तसाच ठेवला असल्याचे सरकारच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.