आरोग्य विभागाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

राज्याच्या आरोग्य विभागाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्याच निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या औषध खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागातर्गत येणाऱ्या सर्व साहित्याची एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. त्यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबवून राज्यातील ४ कोटी ३९ लाख महिलांची आरोग्य तपासणी केली आहे. त्याशिवाय २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मेळघाटातील कुपोषणावर मात करण्यासाठी प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना सुविधा, उपचार करण्याचे कामही हाती घेतले आहे. मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सांवत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या प्रभावी कामगिरीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पुरस्कार विभागाला मिळाले आहेत. गोवर संसर्गाचे प्रमाण रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करून गोवर रोखण्यासाठी कालबद्ध लसीकरण मोहीम राबवून गोवर नियंत्रणात आणला. त्यासोबतच कोविड काळात काम करणाऱ्या ५९७ परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत भरती करण्याचा निर्णय घेत राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.