राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. 10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झाले आहे. मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेत. हसन मुश्रीफ यांना अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. पुन्हा एकदा आज हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही वाहतुकाला बंद करण्यात आला आहे.

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. तसेच या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.

हसन मुश्रीफ यांनी ५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या ईडीची कारवाई लावण्यात यावी असा हेतू साधत आरोप करत आहेत. सत्तेत आल्यापासून सातत्याने विरोधकांना लक्ष केलं जात आहे. त्यामुळे सोमय्या यांची चौकशी करण्यात यावी अशी याचिका हसन मुश्रीफ यांनी दाखल केली होती. तसेच सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये. यासह आरोपपत्रही दाखल करू नये याबाबत पोलिसांना निर्देश देण्याची मागणी देखील हसन मुश्रीफ यांनी केली होती.