जळगाव : विधानपरिषदेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांना पराभवाचे गिफ्ट मिळाले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने खडसे यांनी शिवसेना आणि काँग्रेस विरुद्ध थयथयाट सुरू केला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा एका मताने पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे एका मताने निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेसनेही समर्थन दिल्याचे उघड झाले आहे. या पराभवानंतर खडसे बोलत होते.
खडसे म्हणाले, या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आमचा विश्वासघात केला. जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आमच्याशी धोका झाला. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. राष्ट्रवादीची दहा मते कायम राहिली आहेत. राष्ट्रवादीचं एक मत संजय पवार यांच्या माध्यमातून फुटलं आहे, त्यांनी बंडखोरी केली. आमच्याशी गद्दारी केली.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवायला कोणीही तयार नव्हतं, अशी मधल्या कालखंडातील परिस्थिती होती. पण, सर्वांच्या मदतीने मी स्वतः पुढाकार घेऊन या सर्वांसाठी जिवाचे रान करून जळगाव जिल्हा सहकारी बॅंक आमच्या ताब्यात आणली होती, त्यामुळे शिवसेनेकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती की, त्यांनी संजय पवार यांना समर्थन द्यावं.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेनेही बंडखोर उमेदवार संजय पवार यांना समर्थन दिले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून आम्हाला अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने आमचा विश्वासघात केला. त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आमच्याशी धोका झाला.
