राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनवणी होणार आहे. आज शिवसेनेकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत. तर राज्यपालांच्या वतीने सोलिसेटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडतील. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सत्तासंघर्षाच्या या सुनावणीकडे लागले आहे. येत्या 48 तासांत सत्ता संघर्षांची सुनावणी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल.
शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह आपला वेगळा गट निर्माण केला. यामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण होऊन शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. शिवसेना आपलीच यासाठी दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरु झाली. यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह व नाव हे दोन्ही शिंदे गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निकालाने ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. त्यांनतर ठाकरे गटाने आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे.
