पंतप्रधान पदावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरेंना खिजवलं; शरद पवारांच्या नावाने घोषणा

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे म्हटले हाेते. यावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरे यांना चांगलेच खिजवलं. उध्दव ठाकरे यांचे भाषण चालू असतानाच कार्यकर्त्यांनी शरद पवार पंतप्रधानच्या घाेषणा दिल्या.महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे भाषण संपत असताना कार्यकर्त्यांमधून  घोषणा सुरू झाल्या की शरद पवार पंतप्रधान . यावर वैतागून उद्धव ठाकरे म्हणाले ते ही चालेल. आधी एकत्र येऊन लढले पाहिजे तंगड्यात तंगडी घालू नका.

शिंदे गटावर टीका करताना ठाकरे म्हणाले, लोक येतात-जातात. मला अनेकदा विचारलं जातं की, तुम्हाला याबाबत आधी माहीत नव्हतं का? तुम्ही थांबवलं का नाही? पण त्यांना कशाला थांबवू, असं मी सांगितलं. ही सगळी माणसं विकली गेलेली आहेत. त्यांना सोबत घेऊन लढाई कशी लढू. दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचे आहे त्यांनी थांबावे. नाही तर गेट आऊट. मी त्यांना कशाला थांबवू. मला विकाऊ माणसे नकोत. ते शिवसैनिक होण्याच्या लायकीचे नाहीत. कुणी सांगेल तशीच भूमिका घ्यायची, इतका लाचार मी कधीच झालो नाही आणि होणारही नाही. भाजपसोबत आम्ही होतो, तेव्हा भाजप अन्याय करत होता, आता आम्ही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आहोत, तर ते अन्याय करतात. यांना नक्की काय हवं आहे हेच कळत नाही. जायचंच होतं तर मोकळं रान होतं ना? मी कधी काही विचारलं होतं का, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.