नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी अंतिम टप्यात आली आहे. राज्यपालांच्या वतीने साॅलिसिटर जनरल तुषार मेहता सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. सत्तासंघर्षा वेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदारांना दिलेल्या धमकीची वायफळ बडबडच आता शिंदे गटाच्या पथ्यावर पडत आहे.
सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडताना तुषार मेहता यांनी संजय राऊत यांची व्हिडीओ क्लिप दाखविली. त्यात राऊत म्हणताहेत की, ते महाराष्ट्रात जिवंत परतणार नाहीत. 25 जून रोजी शिवसेनेचे 38 आमदार तसेच प्रहार पक्षाचे 2आणि 7 अपक्ष अशा एकूण 47 जणांनी राज्यपालांना पत्र लिहून सांगितले की त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे, असे तुषार मेहता यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदारांसह कुटुंबीयांवर आणि कार्यालयांवर हल्ले करण्यात आल्याचेही प्रसारमाध्यमात आले आहे. गुवाहाटीहून ४० मृतदेह येतील आणि पोस्टमॉर्टम होणार नाही, अशा धमक्या देण्यात आल्या होत्या, असेही मेहता यांनी सांगितले.
राज्यपालांनी राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश दिले की आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा पुरवली जाईल. राज्य पोलीस कारवाई करत नसल्याने केंद्रीय दलेही सज्ज ठेवण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवांनाही कळवण्यात आले. गृहसचिव, पाेलीस महासंचालक यांना माहिती दिली, असे मेहता म्हणाले.
तुषार मेहता म्हणाले, राज्यपालांना हे पाहावे लागेल की राज्यघटनेचे पालन केले जाते आणि स्थिर सरकार दिले जाते. त्यासाठी फ्लोर टेस्टसाठी बोलावावे लागते.”“मैं चुप रहा तो और गलत फ़हमियाँ बड़ी, वो भी सुना है हमने जो मैंने कहा नहीं।” अशी शायरीही त्यांनी सादर केली. राज्यपालांचा 10 व्या अनुसूचीशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही आणि त्यांना फक्त सरकार स्थिर आहे की नाही हे पाहायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
