बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणी पुण्यात पाकिस्तानी तरुणाला अटक

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारीच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी मुहम्मद अन्सारी याची आई भारतीय असून वडील पाकिस्तानी आहे. पाकिस्तान मध्ये त्याचे कुटुंबीय वास्तव्यास असतानाही ताे सन 2015 पासून आतापर्यंत भवानी पेठ येथे त्याच्या आज्जीकडे बेकायदेशीरपणे काेणत्याही वैध कागदपत्राशिवाय अवैधरित्या वास्त्वय करताना मिळून आलेला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिक मुहम्मद अन्सारी असताना ही त्याने खाेटी कागदपत्रे वापरुन भारतीय पासपाेर्ट बनविला आहे. त्याचा वापर करुन त्याने पुणे ते दुबई असा प्रवास देखील केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम 420, 468, 471, विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 आणि पासपाेर्ट कायदा 1967 चे कलम 12 (1अ), (ए) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस तटकरे करत आहे.