राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांचा समावेश असल्याचे समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता फडणवीसांनी अनिक्षा या नावाच्या डिझायनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. यामध्ये धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारीला दिलेल्या तक्रारीनुसार, अनिक्षा 16 महिन्यांपासून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने त्यांच्या घरीदेखील भेट दिली होती. अनिक्षाने तिच्या वडिलांना एका पोलीस प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली,असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम 8 भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्ग वापरण्याशी संबंधित आहे.
