महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार देखील अयोध्येत जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच आपल्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्याची जवळपास महिनाभरापासून याची चर्चा आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी करण्याआधी काही दिवस आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाताना मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर निघालेल्या आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. कारण, शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आलेली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलेला. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
