कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात नुकताच प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात केला प्रवेश केल्याचं वृत्त आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात सभा घेणार असल्याचं सूतोवातही हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार अशी चर्चा आहे. जाधव यांच्यामार्फत पक्षाचा विस्तार केला जाऊ शकतो.
हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आहेत. त्यांनी मनसेतून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते कायम चर्चेत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं. याचा फटका हा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना बसल्यानं त्यांचा परभाव झाल्याचं बोललं जातं.
हर्षवर्धन जाधव नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी संजना जाधव या भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजना जाधव गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांतून सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हे आव्हान असल्याचं मानलं जातंय. बीआरएस हा भाजपविरोधी पक्ष आहे. हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे चंद्रशेखर राव यांचं मोठं पाठबळ त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
