महाराष्ट्र भूषण माझ्यासाठी ‘भारतरत्न’सारखाच – आशा भोसले

मुंबई : ‘मुलगी बऱ्याच दिवसांनंतर माहेरी आली की, तिचं कौतुक होतं. आज या प्रसंगी मलाही तसंच वाटतंय. कारण मी माझ्या माणसांमध्ये आली आहे. आज मला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, तो माझ्यासाठी तो ‘भारतरत्न’सारखा आहे. कारण तो माझ्या घरच्यांकडून मिळाला आहे. आणि मी त्यासाठी ९० वर्षे वाट पाहत होती, असे उद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शुक्रवारी काढले.

आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना शुक्रवारी, २४ मार्च रोजी राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.

सन २०२१चा पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियावर एका भव्यदिव्य सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. . यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आशाताई भोसले यांनी आतापर्यंत विविध भाषांतून हजारो गीते गायिली. त्यांनी भक्ती संगीतापासून ते डिस्कोपर्यंतची विविध गाणी गात गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला आहे. त्यांनी गायिलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. पुढेही ती तशीच राहतील. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशाताई भोसले यांचा गायनाचा संगीतमय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे गायन बहुश्रुत आहे. हे त्यांनी विविध भाषांमधील गायिलेल्या हजारो वैविध्यपूर्ण गीतांमधून सिद्ध केले आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून वैशिष्ट्य जपले आहे. त्या अष्टपैलू गायिका आहेत. त्यांनी आपल्या गीतातून वेगळे भावविश्व निर्माण केले. त्यांनी गायिलेली गीते लहानापासून ते थोरापर्यंत प्रत्येकाला गुणगुणायला आवडतात हे त्यांच्या गायनाचे यश आहे. त्यांच्याकडून पुढेही संगीत सेवा घडो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.