भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होत आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानसही महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजोपयोगी उपक्रमांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाला.

महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.मंगल प्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घायपतवाडी येथे महिला व बाल विकास विभाग यांचे अखत्यारीतील भिक्षेकरीगृह उपक्रम सुरु आहे. आजमीतीला सर्वसाधारपणे ५० भिक्षेकरी येथे स्थित असून शासकीय अनुदानाद्वारे त्यांना अन्न व निवारा यासारख्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मदत केली जात आहे. पर्यावरण संवर्धनपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीमधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विविध विभागाद्वारे सुरु असणाऱ्या शासकीय योजनांचा एकत्रित लाभ या समाजघटकांना देता येणार असून पुनर्वसनाचे अनोखे मॉडेल या प्रकल्प द्वारे उभे राहू शकेल, असेही मंगल प्रभात लोढा म्हणाले.