देशात प्रत्येकाला एकच कायदा मग तुमच्यासाठी वेगळा का? भाजपचा राहुल गांधींना सवाल

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपने आता प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे खासदार रविशंकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी हे जर विचार करून बोलतात असं मानलं तर राहुल गांधींनी ओबीसींचा जाणीवपूर्वक अपमान केला, असे भाजपचे मत असून भाजप त्याचा निषेध करतो, असे भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ”राहुल गांधी यांच्यावर मानहानीचे 60 खटले सुरू आहेत. राहुल गांधींनी जाणूनबुजून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजप देशभर आंदोलन करणार आहे. राहुल गांधींविरोधात सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडे मोठ्या वकिलांची फौज आहे. राज्यसभा आणि लोकसभेत मोठे वकील आहेत. मग राहुल गांधींच्या या प्रकरणात ते उच्च न्यायालयात का नाही गेले?”, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोर्टाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र, तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. आता त्यांना शिक्षा झाली तर त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे राहुल गांधी हे सर्व राजकारण करत असून ते कर्नाटक निवडणुकीत त्याचा फायदा उठवण्याची सुनियोजित रणनीती आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

”राहुल गांधी आज पुन्हा एकदा खोटं बोलले आहेत. मी लंडनमध्ये काहीही चुकीचं बोललो नाही, असं ते म्हणाले. आपण जिंकलो तर लोकशाही योग्य आणि हरलो तर लोकशाही वाईट आहे, असं त्यांच राजकारण आहे”, असं रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.पुढे प्रसाद म्हणाले, राहुल गांधींना २०१९ मधील त्यांच्या एका भाषणाची शिक्षा झाली आहे. तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला अपमान करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी शिवीगाळ केली होती. त्यासंदर्भात न्यायालयाने माफी मागणार का असे विचारले असता त्यांनी नाही म्हटले आणि त्यांना शिक्षा झाली.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींनी आपल्या स्वभावानुसार सर्व जनतेला भटकावण्याचे प्रयत्न केले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर ते काहीच नाही बोलले. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक विधान केले की, मी विचारपूर्वक बोलतो. म्हणजे २०१९ ला राहुल गांधी कर्नाटकातील सभेत जे बोलले ते विचारपूर्वक होते. ते बोलले होते सर्व मोदी आडनाववाले चोर आहेत. मोदी आडनाववाले बिहार, भारत, पश्चिम भारत आणि मागासलेल्या भागातून येतात. राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे मागासलेल्या भागातील जनतेचा अपमान झाला होता. राहुल गांधींना भर सभेत टीका करण्याचा अधिकार, पण अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही.