सामनाच्या अग्रलेखावरून आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता ‘सामना’ या शिवसेनेच्या मूखपत्राद्वारे शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, देशात अमृतकाल सुरू आहे, परंतु या अमृत काळात रोज विषाचे फवारे उडताना दिसत आहेत. राहुल गांधी चोरांना चोर म्हणाले यात त्यांचा काय गुन्हा आहे? असा सवाल सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आरहे.

दरम्यान, भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखावर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले की, “ज्या बौद्धिक पातळीवरून त्यांचे अग्रलेख येत आहेत. अशा प्रकारच्या अग्रलेखांबद्दल बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितलं होतं की, गांजा किंवा चिलीम ओढलेला माणूस किंवा वेड लागलेला माणूस अशा पद्धतीने लिहू शकतो. मीसुद्धा सामनाचा अग्रलेख लिहिणाऱ्या माणसाची तुलना गांजा आणि चिलीम ओढणाऱ्या माणसासोबतच करेन.”

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्रिपद गेलं, चिन्ह-पक्ष गेला, मंत्री-आमदारही गेले, आता दारोदारी फिरावं लागतंय, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा आणि चिलीम ओढणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख असतो, असंही शेलार म्हणालेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या मुद्द्यावरही शेलार यांनी टीका केली आहे. जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ चर्चा करतील.