उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात जाहीर सभा

नाशिक : उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर सभा आज मालेगाव येथे होणार आहे. शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे कोणत्या मुद्यावर बोलणार, याची उत्सुकता राज्याला लागून आहे.

ठाकरे गटातून फुटून शिवसेनेत गेलेल्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांने शिवगर्जना सभा घेऊन त्या आमदारांचा समाचार घेण्याची रणनिती आखलेली आहे. मालेगाव हा पालकमंत्री दादा भुसे यांचा बाल्लेकिल्ला आहे. तसेच नांदगाव आ. सुहास कांदे यांचा मतदार संघ आहे. उद्धव ठाकरे गटाने अव्दय हिरे यांना मालेगावमध्ये भुसेंच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरवण्यासाठी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिलेला आहे. त्यानंतर हिरेंना थेट उपनेतेपदी नियुक्त केलेले आहे.मालेगावात उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा घेण्याची चाचपणी करण्यासाठी संजय राऊत यांनी दोनदा दौरे केले होते.

पालकमंत्री भुसे यांनी अधिवेशनात राऊत यांना प्रतिउत्तर देत मालेगावात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मालेगाव येथे राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. शिवगर्जना सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांंच्या बैठका झालेल्या आहेत. सभेच्या पूर्वसंध्येला खा. संजय राऊत यांच्यासह खा.विनायक राऊत तळ ठोकून होते. शिवगर्जना सभेला जमणार्‍या गर्दीवरून अव्दय हिरे यांच्या पुढील राजकारणाचे भविष्य ठरणार आहे.

मराठवाडा, मुंबई आणि कोकण पाहता ठाकरे गटाची उत्तर महाराष्ट्रात अत्यंत कमकुवत बाजू पाहायला मिळते. ज्यामुळे २०२४ चा विचार केला असता ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रातील जागांसाठी तयारी करणे आत्तापासूनच गरजेचे आहे. तर आजच्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमके कोणावर निशाणा साधतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.