राज ठाकरे वसंत मोरेंसाठी पुणे दौऱ्यावर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. मात्र आता खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे वसंत मोरे यांच्यासाठी पुण्यात आले आहेत. त्याला कारण देखील खास आहे. वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून गुजरवाडी येथे उभारण्यात आलेल्या डॉग पॉंडला राज ठाकरे भेट देणार आहेत.

मनसे नेते वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून गुजरवाडी येथे डॉग पाँड उभारण्यात आले आहे. या डॉग पाँडचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं. मात्र मध्यंतरी राज ठाकरे आजारी असल्यामुळे ते या डॉग पाँडच्या उद्घाटन कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. गेल्या आठवड्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते, त्याच वेळी त्यांनी वसंत मोरे यांना भेट देण्याचा शब्द दिला होता. राज ठाकरे यांचं काल रात्री पुण्यात आगमन झालं. ते आज सकाळी दहा वाजता वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉग पाँडला भेट देणार आहेत. डॉग पाँडची पहाणी करून ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मनसे नेते वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून हे डॉग पॉंड उभारण्यात आले आहे. डॉग पाँड हे पुणे महापालिका मान्यता प्राप्त कुत्रा, मांजर निर्बीजीकरण केंद्र असून, हे राज्यातील सर्वात मोठं केंद्र आहे. आज राज ठाकरे हे या डॉग पाँडची पहाणी करणार आहेत.

यासोबतच राज ठाकरे आज पुण्यातल्या स्थानिक नेत्यांची बैठक घेणार असून मात्र ही बैठक कुठे घेणार आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, राज ठाकरे बैठकीत कार्यकर्त्यांना काय सूचना देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मुंबईतल्या माहिम समुद्रातील मजारीभोवती केलेल्या अतिक्रमणाचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर ठाकरेंनी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. अखेर ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर मुंबई जिल्हा प्रशासनाकडून मजारीभोवतालचं अतिक्रमण तत्काळ हटवण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यातील इतरही भागातील दर्गाभोवतालच्या अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे.दरम्यान, राज्यातील विविध भागांतील दर्ग्याभोवतालचे अतिक्रमण आणि पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराबाबत आज काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.