चिंताग्रस्त शरद पवारांनी केले राहुल गांधींचे प्रबोधन! म्हणाले सावरकरांचा मुद्दा सोडून बोला

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानामुळे महाराष्ट्रातील जनतेत नाराजी आणि महाविकास आघाडीत फुतीची भीती यामुळे चिंताग्रस्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे प्रबोधन केले. सावरकरांचा मुद्दा सोडून बोला अशी भूमिका त्यांनी मांडली.

काँग्रेसच्या वतीने नवी दिल्लीत विरोधी पक्षांना डिनरचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे गटाने यावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी टिकते की नाही अशी भीती आहे. उद्धव सेनेच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला. शरद पवार यांनी पुढाकार घेत राहुल गांधी यांना सुनावले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्यनाही, अशी भूमिका मांडली. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असेही म्हणाले. शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही शरद पवारांच्या मताचा आपण आदर करत असल्याचे सांगितले.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव सेनेलाही याच मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेने घेरले आहे. त्यामुळे ‘हिंदुत्ववादी’ प्रतिमेला तडा गेलेल्या उद्धव ठाकरेंनी रविवारी ‘सावरकरांचा अवमान सहन करणार नाही’ असा इशारा द्यावा लागला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंतर्फे आयोजित डिनरवर उद्धव सेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली.खासदारकी रद्द झाल्यानंतर शनिवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या मुद्दयावर माफी मागणार नाही हे सांगताना ‘माझे नाव सावरकर नाही गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाही असे वक्तव्य केले होते.