मी गद्दारी केली ती केवळ दिव्यांगांसाठी – बच्चू कडू

मला गद्दार म्हणताय? होय, मी गद्दारी केली ती केवळ दिव्यांगांसाठी. यामुळे देशातीलच नव्हे, तर जगातील पहिल्या अपंग- दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली. माझी गद्दारी जनतेसोबत नसून, दीव्यांग व शेतकरी हितासाठी आहे. असे प्रतिपादन प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले.पाटोदा येथे संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात श्री. कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्कार येथील माजी सभापती प्रवीण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

राज्यात सत्तांतर झाले. त्यात मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालो. त्यामुळे माझ्यावर सातत्याने टिका होत आहे. विरोधकांनी हा राजकीय मुद्दा केला आहे. मात्र मी त्याची फारसी परवा करीत नाही, कारण माझे समर्थक माझ्यासमवेत आहेत. मी जर बंडखोरी केली नसती तर दिव्यांगासह विविध घटकांसाठी आज जे निर्णय होत आहेत ते झाले असते का?, असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी शेतकरी, सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेळाव्यात रक्तदान शिबिर, तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षणाची नाव नोंदणीही या वेळी करण्यात आली.