मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरातील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदीर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून कलम 144 चे आदेशही लागू केले. पोलिसांकडून मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मुंब्र्यासारख्या संवेदनशील भागात शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन केले आहे. तसेच जर कोणी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 22 मार्च रोजी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात विविध ठिकाणी एका विशिष्ट धर्माच्या अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर अविनाश जाधव यांनी ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुंब्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अवैध मजार आणि मशिदी हटवण्याचं आवाहन केलं होतं. जर कारवाई केली नाही तर या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधू असंही जाधव यांनी म्हटलं होतं.आम्ही कायदेशीर केलेल्या मागणीला आता धार्मिक रंग चढवला जात आहे. मी नऊ तारखेनंतर नक्की मुंब्र्यात जाईन आणि हनुमानाचे मंदिर उभारुन दाखवेन, असं अविनाश जाधव म्हणाले.
