पगार मागितला म्हणून ठाकरे गटाच्या माजी आमदाराची शिक्षकाला हात पाय तोडण्याची धमकी

पगार मागितला म्हणून ठाकरे गटाच्या एका माजी आमदाराने शिक्षकाला हात पाय तोडण्याची धमकी दिली. आमदार तुकाराम काते यांची एका शिक्षकाबरोबरची कथित ऑडिओ क्लिप प व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पगार मागणाऱ्या शिक्षकाला माजी आमदार तुकाराम काते शिवीगाळ करताना आणि धमकावताना दिसून येत आहे.

तुला पगार देणार नाही. पंतप्रधानांकडे जाऊन माझी तक्रार कर. तुला काय करायचं ते कर. पण पगार मिळणार नाही, असं सांगतानाच जास्त हुशारी केली तर हातपाय तोडून हातात देईल, अशी धमकीही तुकाराम काते यांनी या शिक्षकाला दिली आहे. शिक्षक विनोद पोकळे आणि आमदार तुकाराम काते यांचा संवाद दिसतोय. शिक्षक विनोद पोकळे हे तुकाराम काते यांच्या शाळेत नोकरीला होते. इंग्रजी माध्यमात इयत्ता 8 ते 10 वीच्या वर्गाला शिकवत होते. त्यांना सहा महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही.

कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण पुढीलप्रमाणे :

शिक्षक : सर, नमस्कार. विनोद पोकळे बोलतो सर. आपल्या शाळेत कामाला होतो. पगार आला नाही सर 23 महिन्याचा.

तुकाराम काते : कोण?

शिक्षक : विनोद पोकळे बोलतो सर. आपल्या शाळेत कामाला होतो. इंग्लिश मीडियमला. 8 वी, 9 वी. 10वीला शिकवायला.

तुकाराम काते : हां हां…

शिक्षक : पगार राहिला आहे सर 23 महिन्याचा…

काते : तू आता काय कर माहित्ये…

शिक्षक : हां सर

काते : पंतप्रधानांकडे कंप्लेट कर माझी. पगार देत नाही अशी पंतप्रधानांकडे कंप्लेट कर. बारा गावात फिरून येतो, सर्वांना सांगतो माझा पगार दिला नाही… पगार दिला नाही… मी तुला शाळेत असताना ये बोललो होतो, तेव्हा आलाच नाही.

शिक्षक : मी आलतो सर…सर सर सॉरी… तुम्ही…

काते : अरे कधी आला होता? कधी आला होतास रे गाढवा…?

शिक्षक : सर… मी शाळेत आलतो सर… नागेश सरांनी ….

काते : साला हातपाय तोडून हातात देईन तुझ्या जास्त हुशारी केली तर…

शिक्षक : म्हणजे?

काते : समजला काय? साला नालायकगिरी करतो…

शिक्षक : नालायकगिरी काय केली सर?

काते : इकडे जा तिकडे जा… ही नालायकगिरी … नालायकगिरी इकडे तिकडे कुठे जातो… सर्वांकडे जातो…कशाला जातो?

शिक्षक : अहो, सर सर्वांकडे कुठे गेलो… नागेश सर सरळ बोलतात पगार देणार नाही. काय करायचं करून घ्या…

काते : नागेश सर… नागेश नाय… तू दुसरीकडे गेला तर मला फोन आले तिकडून… समजलं..

शिक्षक : सर पगारासाठी मी सहा महिने राऊंड मारत होतो.

काते : तुला कुठं जायचं जा…आणि मला परत फोन केला तर बरोबर करून टाकेल तुला मी.

शिक्षक : म्हणजे सर?

काते : म्हणजे काय नाय… फोन ठेव साल्या XXX

शिक्षक : अहो सर पगार राहिला. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात सर असं बोलतात का?