राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने रेडीरेकनेर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार नाहीत. मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच सन 2022-23 मधील रेडीरेकनर दर 2023-24 च्या आर्थिक वर्षात कायम राहणार आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याचे उप-सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रकांना पाठवलं आहे.
राज्यात मुद्रांकद्वारे यंदा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा विक्रमी महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. अभूतपूर्व घरखरेदी २०२२-२३ या वर्षात झाली. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थावर मालमत्ता खरेदी केल्याने बांधकाम क्षेत्रालाही सुगीचे दिवस आले. त्यामुळेच वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असण्याची शक्यता आहे. या आधी कोरोनाकाळत मुद्रांक शुल्काचे दर कमी केल्याने त्या काळातही मोठ्या प्रमाणात घरखरेदी झाली होती.”वर्ष 2022-23 चे वार्षिक दर विवरणपत्रात कोणताही बदल न करता वर्ष 2023-24 मध्ये चालू ठेवण्यात यावे,” असे निर्देश देण्याचा शासनाचा आदेश असल्याचं बजाज यांनी नमूद केलं आहे.
