मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानींना नववं स्थान मिळालं आहे. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदाणी जागतिक यादीत २४ व्या स्थानावर घसरले आहेत. २४ जानेवारी रोजी अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. मात्र, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.

मुकेश अंबानी हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 9व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही 100 अब्ज डॉलरहून अधिक कमाई करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. रिलायन्सचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेल अशा विविध क्षेत्रात पसरलेला आहे.फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती 2,100 अब्ज डॉलर इतकी आहे. वर्ष 2022 मध्ये हा आकडा 2,300 अब्ज डॉलर होता. गेल्या वर्षभरात जगातील टॉप 25 श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली असल्याचे फोर्ब्सच्या यादीत म्हटले आहे.

जगातील २५ सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती २.१ ट्रिलियन डॉलर आहे. २०२२ च्या २.३ ट्रिलियन डॉलर लक्ष्यापेक्षा हे २०० अब्ज डॉलर कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश लोकांनी संपत्ती गमावली. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांना सर्वाधिक फटका बसला आहे, कारण त्यांच्या कंपनीचे शेअर्स ३८ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत ५७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. बेझोस ११४ अब्ज डॉलर्ससह अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.