नवीन संसद भवनाचे पुढील अधिवेशनात तर अयोध्येतील राममंदिराचे दिवाळीला लोकार्पण होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देशातील मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. यामध्ये अयोध्येतील राम मंदिर आणि नव्या संसद भवनाचा समावेश आहे. राम मंदिराचे लोकार्पण नियोजित वेळेच्या आधी होण्याची शक्यता आहे. तर नव्या संसद भवनाचा शुभारंभसुद्धा याच वर्षी होऊ शकतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नव्या वर्षात राम मंदिराचे लोकार्पण होईल असं म्हटलं होतं. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात दिवाळीत राम मंदिराचं लोकार्पण होईल असं सांगण्यात येतंय. यासाठी नवी तारीख निश्चित करण्यात येत आहे.

राममंदिर १ जानेवारी २०२४ पर्यंत तयार होईल आणि मकर संक्रांतीला ते भाविकांसाठी उघडण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चार महिन्यांपूर्वी म्हटलं होतं.

नव्या संसद भवनाच्या इमारतीचेही उद्घाटन लवकरच होऊ शकते. पंतप्रधान मोदींनी नुकतीच संसद भवनाच्या कामाची पाहणी केली होती. त्याचे फोटोही समोर आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्या संसद भवनाचा शुभारंभ करतील. नव्या संसदेतच जुलै महिन्यातील अधिवेशन होण्याची दाट शक्यता आहे.