स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी तीन आठवडे पुढे, महापालिका जिल्हा परिषद निवडणुका पावसाळ्यानंतरच

मुंबई : ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महानगरपालिका- जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणखी तीन आठवडे पुढे गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी निवडणुका होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ही सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनेला विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावर ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ती झाली नाही. त्यानंतर १४ मार्च रोजी ही सुनावणी ठेवण्यात आली. मात्र त्याही दिवशी सुनावणी न होताच पुढची तारीख देण्यात आली होती.

पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता यामुळे मावळती आहे.निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेतला तर मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात निकाल आला तरी जून पर्यंत निवडणूक अशक्य आहे.त्यामुळे पावसाळ्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान या निवडणुका घ्याव्या लागतील.