केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीसह तृणमुल काँग्रेस आमि सीपीआयला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता केवळ प्रादेशिक पक्ष असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आमि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी पक्षांना कोणते निकष पाळावे लागतात?
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ६ टक्के मतं, चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळवली पाहिजेत.
- लोकसभा निवडणुकीत चार जागांवर त्या पक्षाला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला पाहिजे.
- लोकसभा निवडणुकीत २ टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे आणि ते विजयी उमेदवार तीन वेगवेगळ्या राज्यातून विजयी झालेले असणं आवश्यक आहे.
- चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणं आवश्यक आहे.
