अरविंद केजरीवाल राजकारणातले नटवरलाल; भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावालांची टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीवर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी जोरदार टीका केली आहे. केजरीवाल हे भारतीय राजकारणातले नटवरलाल आणि पिनाचिओ असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल यांनी गतकाळात लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात केलेले ट्विट्स आपल्या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी दाखविले. “केजरीवाल यांनी आतापर्यंत अनेकवेळा वैचारीक यु-टर्न घेतलेला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी अण्णा हजारेंना पाठिंबा दिला होता. आता एकेकाळी ज्यांच्याविरोधात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे.”, असा आरोप शेहनाज पुनावाला यांनी केला.

भाजपा नेते शेहजाद पुनावाला पुढे म्हणाले, “तुम्ही (केजरीवाल) तेजस्वी यादव यांची भेट घेतली. लालू प्रसाद यादव यांचे नाव जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात घेतले जात आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्या होत्या. हा आरोप आम्ही नाही तर तुमचाच सहयोगी पक्ष जनता दलाने (युनायटेड) लावला आहे. राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यूनायटेड) यांची युती म्हणजे चुलत भ्रष्टाचारी भाऊ. लालू प्रसाद आणि त्यांच्या मुलाने रिव्हर्स रॉबिनहूडचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांनी गरीबांकडून चोरी करून श्रीमंतामध्ये वाटप केले. आता केजरीवाल लालू प्रसाद आणि त्यांच्या मुलाला कट्टर इमानदार असल्याचे प्रमाणपत्र देणार का? हेच प्रमाणपत्र त्यांनी सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना दिले होते.”