भारतात विकसित तेजस लढाऊ विमानाची आफ्रिकेतील देश खरेदी करणार

चीनकडून निर्मित लढाऊ विमानांनी चहुबाजूने घेरला गेलेला आफ्रिकन देश बोत्सवाना आता भारतात विकसित तेजस लढाऊ विमानांचा प्रशंसक झाला आहे. बोत्सवानाच्या सैन्याने भारत सरकारची कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. एचएएलकडूनच तेजस लढाऊ विमानाची निर्मिती केली जाते. बोत्सवानाचे सैन्य तेजस लढाऊ विमानांची खरेदी करू इच्छित आहे. बोत्सवानाने भारतासोबत यासंबंधी करार केल्यास शस्त्रास्त्र निर्यातीच्या दिशेने ही मोठी झेप ठरणार आहे.

बोत्सवानाचे सैन्य स्वतःच्या जुन्या लढाऊ विमानांचा वापर थांबवू पाहत आहे. 1996 मध्ये कॅनडाकडून खरेदी करण्यात आलेल्या लढाऊ विमानांचा वापर बोत्सवानाचे सैन्य करत आहे. बोत्सवानाचे सैन्य सध्या कॅनडाच्या सीएफ-5ए लढाऊ विमानांचा वापर करत आहे. बोत्सवानाला स्वतःच्या शेजारी देशांकडून धोका निर्माण झाल्याने हा देश स्वतःच्या लढाऊ विमानांना बदलू पाहत आहे.

बोत्सवानाचा शेजारी देश जांबिया मिग-21 च्या अत्याधुनिक आवृत्तीचा वापर करत आहे. तर नामीबियाने चीनकडून 12 चेंगदू एफ-7एनएम विमाने खरेदी केली आहेत. तर झिम्बाम्बेने 2004 मध्ये चीनला एफसी-1 लढाऊ विमानांची ऑर्डर दिली होती. शेजारी देशांच्या वायुदलांकडून हवाई क्षेत्राचे उल्लंघन होत असल्याचा आरोप बोत्सवाना सरकारकडून वारंवार केला जात आहे. यापूर्वी 1990 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सनी बोत्सवानाच्या सैन्यतळावर हल्ला केला होता. बोत्सवानाचे दक्षिण आफ्रिका अन् झिम्बाम्बेसोबत शत्रुत्व आहे.

बोत्सवानाने दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या सीमेनजीकच स्वतःची लढाऊ विमाने तैनात केली आहेत. एफ-16 लढाऊ विमानास पसंती बोत्सवानाने यापूर्वी दक्षिण कोरियाच्या एफए-50 विमानांना खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु नंतर स्वतःचा निर्णय बदलला होता. याचबरोबर बोत्सवानाच्या सैन्याने अमेरिकेकडून एफ-16 विमानांना खरेदी करण्याचा विचार चालविला होता. परंतु अमेरिकेच्या कंपनीने याकरता मंजुरी दिली नव्हती. बोत्सवानाने स्वीडनकडून साब लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु केली होती, किंमत अधिक असल्याने बोत्सवानाला हा विचार सोडून द्यावा लागला होता.