मातोश्री महात्म्य वाढविण्याचा दुबळा प्रयत्न, नाना पटोले यांनी फेटाळली राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा

मुंबई: सिल्वर ओकच्या दारी…वरून टीका सुरू झाल्यावर ठाकरे गटाकडून मातोश्रीचे महात्म्य वाढविण्याचा दुबळा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार अशी पुडी सोडून देण्यात आली. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेणुगोपाल येत आहेत. त्यात सर्व गोष्टी ठरतील. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेटही होऊ शकते, अशी शक्यता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याची चर्चा सुरू करण्यात आली. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींचा असा कोणताही प्रोग्राम नाही असे म्हणत या भेटीबाबतची शक्यता तरी फेटाळून लावली आहे. संजय राऊत यांनी के.सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले.

संजय राऊत म्हणाले, विरोधक एकत्र येणार. काँग्रेसने सगळ्या विरोधकांना एकत्र येऊन मोट बांधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राहुल गांधी यांच्या या योजनेचे आम्ही स्वागत करतो. नितीश कुमार, तेजस्वी यादव राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली.

संजय राऊत म्हणाले, सोमवारी काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. त्यांच्यामध्ये चर्चा होईल. त्या भेटीत अनेक मुद्दयांवर चर्चा होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी सुद्धा भेट होऊ शकते. मी राहुल गांधी, सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे.