मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकते, असा दावा शुक्रवारी शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी केला. भुसे म्हणाले, अजित पवार अस्वस्थ आहेत. हे तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत. मग काही पण होऊ शकते.
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना भुसे म्हणाले की, संजय राऊतांना स्वप्न पाहयाला बंदी नाही. त्यांनी अशी स्वप्ने बघत रहावीत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर दादा भुसे म्हणाले की, हा सारा बालिशपणा आहे. त्यांनी हे तेव्हाच बोलायला हवे होते. ही राहुल गांधी यांची स्टाइल आहे. ते बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहेत. हा महाविकास आघाडीच्या संगतीचा परिणाम आहे. ते विकासावर बोलायला तयार नाहीत. कारण आम्ही तळागाळात जाऊन काम करतो आहोत. त्यांच्या पायाखालची त्यामुळे वाळू सरकली आहे.
