मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही असे इशारे उद्धव ठाकरे देत असताना काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या नाकाव टिच्चून टीका सुरूच आहे. सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला असल्याचा दावा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफीवीर म्हणून बदनामी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्याला आपण काही किंमत देत नाही असे काँग्रेस नेत्यांचे वर्तन आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करणाऱ्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका मेळाव्यात सावरकरांची बदनामी केली आहे. शिवसेना-भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेच्या विरोधात बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला असल्याचा दावा केला आहे.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, शिवसेना-भाजप कधीच फुले, शाहू, आंबेडकर गौरव यात्रा काढणार नाही. ते फक्त सावरकरांचीच गौरव यात्रा काढतील. पण माझ्यासारख्या महिला भगिनीला त्यामुळे कसे सुरक्षित वाटेल? कारण सावरकरांनी आपल्या विरोधकांविरुद्ध बलात्कारासारख्या राजकीय हत्याराचा वापर करायचे आदेश दिले होते, असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी तारस्वरात केला आहे.
शिवानी वडेट्टीवार सध्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे हे बेछूट भाषण सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
